लोणी काळभोर, (पुणे) : आरक्षणाची लोकसंख्येच्या प्रमाणात अ.ब.क.ड वर्गीकरण करावे व इतर प्रलंबित मागण्यांसाठी मातंग समाजाचे नेते विष्णू कसबे यांनी गंजपेठ पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पदयात्रा सुरू केली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी हवेली तालुका मातंग समाजाच्या वतीने पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी (ता.५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सकाळी दहा वाजताच आंदोलनकर्त्यांनी महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. तरीसुद्धा कोणत्याच सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. तेव्हा यासंदर्भात सरकारने आता तत्काळ ठोस निर्णय घ्यावा. यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा सरकारला यावेळी देण्यात आला. यातून उत्पन्न होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल असे सांगण्यात आले.
यावेळी आनंद वैराट, दिगंबर जोगदंड, विजय सकट, नितीन लोखंडे, आकाश मात्रे, संजय भालेराव, सहदेव खंडागळे, राहुल ढेले, राजाभाऊ आढागळे, अमोल लोंढे, दिपक मात्रे, सचिन शेलार, विशाल लोणारे, राकेश लोंढे, अनिल कांबळे, किशोर शिंदे, रोहित शेलार, अशोक मात्रे, सागर मात्रे, विजय रणदिवे, विशाल बोराडे, भीमराव सकट, संतोष आढागळे, कृष्णा मात्रे, विक्रम बोराडे, गुरु भोसले, ओंकार जाधव, गणेश भिसे, बबन मात्रे, सुजल शेंडगे, जय मात्रे व हवेली तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.