पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगर भागात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी महापालिकेच्या कामाचा निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा उघड केला. याच कामावर महापालिकेच्या वतीने आज मलमपट्टी सुरू केली. शहरात बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे महापालिकेने केलेल्या निष्कृट दर्जाच्या कामाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले आहे. एक ते दोन महिन्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर खड्डे पडलेल्या ठिकाणी पॅच मारले होते. त्यामुळे समतल रस्त्याच्या मधेच उंचवटे तयार झाले होते. तर, पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.
मुसळधार पावसाने ठेकेदारांनी केलेल्या निष्कृट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे. तर, नागरिकांवर खड्ड्यांमधून रस्ता शोधत त्यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे. शहरात विविध कामांसाठी तसेच खासगी कंपन्या वर्षभर खोदकाम करतात. जेथे खोदकाम केले जाते, तेथे जास्त खड्डे तयार होतात. काही ठिकाणी दुरुस्ती करूनही पुन्हा रस्ते खोदले जातात. त्यामुळे यंदाही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर, जनतेच्या करातून होणाऱ्या कामांचा दर्जा उत्तम असावा. चांगल्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी करदात्यांची अपेक्षा आहे.