शिरुर : फॉरच्यूनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून थेट गाळ्यात घुसली. सदर अपघात रविवारी (दि.४) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सरदवाडी (ता. शिरुर) येथे घडली. याबाबत आशिष सरोदे यांनी ११२ नंबरवर फोन करुन शिरुर पोलिसांना माहिती दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाघोली येथील एक टोयाटो कंपनीची फॉरच्युनर कार रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शिरुरहून पुण्याला जात होती. सरदवाडी गावाच्या हद्दीत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गाळ्यात घुसली. या अपघातात सदर गाडी व गाळ्याचे मोठे नुकसान झाले. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.