लोणी काळभोर : अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येत येण्यासाठी रामभक्तांना निमंत्रण देण्यासाठी अक्षता अभिमंत्रित करून अक्षता कलश हडपसर येथील राम मंदिरात शनिवारी (ता. ९) आणण्यात आला होता. या कलशाचे लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्री रामदरा तीर्थक्षेत्र शिवालयाचे श्री हेमंत पुरी महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन करून हडपसर परिसरातील ८ ठिकाणी वितरण करण्यात आले.
अक्षता कलशांचे समरसता यज्ञ करून विधिवत पूजन करण्यात आले. हिंदू धर्मातील विविध संप्रदायांतील एकेका दाम्पत्यास प्रातिनिधिक स्वरूपात यज्ञाला बसविण्यात आले. नंतर महिलांनी हे अक्षता कलश डोक्यावर घेऊन श्रीराम मंदिरात आणले. तेथे साधू-संतांनीही कलशांचे पूजन केले. त्यानंतर हडपसर परिसरातून या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रभू श्रीरामांची मूर्ती, सनई, बँड, चौघडे तसेच भगवे ध्वजधारी रामभक्त सहभागी झाले होते. या दरम्यान, हनुमान चालीसा पठण, श्री रामाचे, हनुमानाचे नामस्मरण, जयघोष व आरती करण्यात आली. या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान, अयोध्येला प्रभू रामाची सेवा करण्यासाठी १९९२ मध्ये गेलेल्या हडपसर परिसरातील कारसेवकांची नागरिकांनी नावे शोधून यादी तयार केली होती. या सर्व कारसेवकांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कारसेवक कोणाला म्हणतात?
गुरुद्वारामध्ये लोक ज्याप्रमाणे निःस्वार्थ सेवा आणि धार्मिक कार्य करतात, त्याचप्रमाणे कारसेवकांचीही भूमिका असते. खरे तर ‘कारसेवक’ हा शब्द संस्कृतमधून आला आहे. कर म्हणजे हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारा. जे लोक कोणत्याही धार्मिक कार्यासाठी किंवा संस्थेसाठी नि:स्वार्थ आणि विनामूल्य सेवाभावी कार्य करतात, त्यांना कारसेवक म्हणतात.
‘कारसेवक’ शब्दाची उत्पत्ती
धर्माशी जोडून बहुतेक परोपकारी कार्य केले जात असल्याने, कारसेवक या शब्दाचा अर्थ धार्मिक कार्य नि:स्वार्थपणे व विनाशुल्क करणारी व्यक्ती असा होतो. त्या काळात विश्व हिंदू परिषदेने ज्या लोकांना राम मंदिराची कारसेवा करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून अयोध्येत पाठवले होते, त्यांना कारसेवक म्हटले जात होते. कारसेवकाचे स्पेलिंग देखील ‘के’ या अक्षराने सुरू होते. इंग्रजीत या शब्दाला स्वयंसेवक (volunteer)असे संबोधले जाते.