पुणे : पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. शहरातील एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर पोहचली आहे. दरम्यान, झिकाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते, आता पुन्हा एका रुग्णाची भर पडली आहे.
एरंडवण्यातील गणेशनगर भागातील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. संसर्ग झालेल्या गर्भवतीची मे महिन्यात सोनोग्राफी चाचणी केली होती. त्या अहवालामध्ये झिकाचा काहीही परिणाम दिसून आलेला नसून महिलेची प्रकृती स्थिर आहे. गर्भवतीमध्ये झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
एरंडवणे परिसरात या आधी झिकाचे दोन रुग्ण आढळले होते. त्यामध्ये ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीचा समावेश होता. आता या परिसरात एका गर्भवतीला संसर्ग झाल्याने रुग्णाची संख्या तीन वर गेली आहे. तसेच मुंढव्यात ४७ वर्षीय महिला आणि तिचा २२ वर्षीय मुलगा यांना झिकाचा संसर्ग झाला आहे.
त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या पाचवर पोहचली आहे. झिका रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणे असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.