पुणे : पुण्यातील रविवार पेठेत रिक्षा चालकाने निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेऊन अंगठा तोडल्याची घटना घडली आहे. दुचाकी पुढे नेताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घेतला. रिक्षाचालकाने जोरात चावा घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा तुकडाच पडला. ज्ञानेश्वर खंडू बेंद्रे (वय-६६, रा. अयोध्यानगरी, प्रगतीनगर, बोपोडी) असं जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याप्रकरणी रिक्षा चालक गणश सोमनाथ भुसावळकर (वय-६०, रा. हेरंब काशीनाथ सोसायटी, धनकवडी, बालाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर खंडू बेंद्रे (वय-६६, रा. अयोध्यानगरी, प्रगतीनगर, बोपोडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर बेंद्रे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. ते रविवार पेठेतून पत्नीसह दुचाकीवरुन निघाले होते. रविवार पेठेत गृहोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील राजहंस मेटल दुकानासमोर फिर्यादी बेंद्रे यांनी त्यांची दुचाकी लावली होती. त्या ठिकाणाहून त्यांना दुचाकी काढायची होती. त्यामुळे रिक्षाचालक गणेश भुसावळकरला थांबावे लागले. या कारणावरून आरोपी भुसावळकरने बेंद्रे यांना शिवीगाळ केली.
‘पुण्यात येतात आणि गाड्या आडव्या घालतात’ असे भुसावळकर त्यांना म्हणाला. बेंद्रे यांनी त्याला जाब विचारला. आरोपीने त्यांचा शर्ट पकडून धक्काबुक्की करत बेंद्रे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा जोरात चावा घेतला. यामध्ये बेंद्रे यांच्या अंगठ्याचा तुकडा पडून त्यांच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पारखे करत आहेत.