पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. अशातच आता राजगड तालुक्यातील रांजणे गावच्या हद्दीमध्ये रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे तर विवाहीत मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता. 13) रोजी रात्री घडली आहे.
शालन पासलकर (वय-65), दिपक पासलकर (वय-45), (मुळगाव गिवशी (ता. राजगड) सध्या राहणार दौंड) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर कविता मरळ (वय-40) रा. कानंद (ता. राजगड) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील काही भागात रविवारी जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे अपघात झालेल्या परिसरामध्ये मोठे झाड पडले होते. झाडाच्या अलीकडेच रांजणे गावच्या हद्दीत असलेल्या छोट्याशा पुलाच्या कठड्याला रिक्षा धडकून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तसेच कानंदचे पोलीस पाटील संजय कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई शालन पासलकर आणि मुलगा दिपक पासलकर हे कानंद येथे मुलीकडे गेले होते. तेथून पाबे घाट मार्गे पुण्याकडे जाताना रांजणे गावच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला आहे. रविवारी झालेल्या या भीषण अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला दिल्यानंतर रेस्क्यू टिमने घटनास्थळी पडलेले झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस पंचनामा सुरु आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यापासून पुण्यात अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. गाड्यांचा भरधाव वेग, रस्त्यांची दुरावस्ता आणि रस्त्यांची चुकलेली रचना यामुळे अनेक अपघात झाले. या अपघातात अनेक निष्पाप जीवांचा बळीदेखील गेला आहे.