विजय लोखंडे
वाघोली : पुणे जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील वाघोली नजीकच्या लोणीकंद तसेच भावडी या गावांमधील खान उद्योजकांकडून शासनाची फसवणूक होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसापासून गौण खनिज दगड खाणींची मोजणी सुरू केल्याची माहिती गौन खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
लोणीकंद व भावडी या दोन्ही गावांच्या परिसरामध्ये अनेकांचे दगड क्रेशर खाणींचे उद्योग आहेत. काही खाणींचा परवाना २२ जानेवारी २०२४ रोजी संपलेला असून कित्येक व्यावसायिक विनापरवाना चोरून खान चालवत असल्याचा प्रकार समोर आले आहेत.
त्याप्रमाणे पूर्वीच्या परवानगीमध्ये अनेकांनी शासनाला भरलेल्या रॉयल्टीच्या अधिक पटीने उत्खनन केल्याचा प्रकार घडला आहे. शासनाच्या डोळ्यात माती टाकत तसेच शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. यालाच वाचा फोडण्यासाठी गौण खनिज तहसीलदार ज्योती देवरे यांनी खान उद्योगांमध्ये झालेल्या उत्खननाची ड्रोन द्वारे पंधरा दिवसापासून मोजणी सुरु केल्याने उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.
तहसीलदार देवरे यांचे खान उद्योगाच्या ठिकाणी आगमन होताच लबाड खान उद्योजक, वाहतूकदार यांची पळापळ झाली. काही मिनिटातच वाहतूक करणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद झाल्याचे चित्र दिसून आले. पंधरा दिवसापासून लोणीकंद, भावडी, पुरंधर, शिरूर, मावळ, नऱ्हे आंबेगाव, फुरसुंगीसह पुणे परिसरात जवळपास ८० ते ९० विनापरवाना गौन खनिज वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.