पुणे : पुण्यातील एक सेवानिवृत्त महिला सायबर फसवणुकीची बळी पडली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने या ७० वर्षांच्या महिलेकडून पैसे घेण्यात आले. चांगल्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर महिलेची तब्बल २.८५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला हनुमाननगर येथील रहिवाशी आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे महिलेने बँकेत ठेवले होते. दरम्यान, महिलेला मोबाईलवर एक मेसेज मिळाला. त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर महिलेने बँकेत जमा केलेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी संबंधित व्यक्तींकडे दिले. सुरुवातीला महिलेला चांगला परतावा मिळाला.
दरम्यान, विश्वास बसल्याने महिलेने हळूहळू सर्वच रक्कम आरोपींना दिली. पण, त्यानंतर महिलेला परतावा मिळणे बंद झाले. महिलेने संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सायबर फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्हिडिओला लाईक करणे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे, ऑनलाईन फ्रेंडच्या माध्यमातून फसवणूक अशी प्रकरणे समोर आली आहेत. यासाठी नागरिकांच्या सायबर प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.