शिरूर : ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेत शिक्षकेतर कर्मचारी म्हणून सेवा बजावली. सेवानिवृत्त होताना आपली आठवण शाळेत कायमस्वरूपी रहावी यासाठी सेवानिवृत्त रयत सेवक अब्दुल रहेमान शमशुद्दीन तांबोळी यांनी आकर्षक लोखंडी प्रवेशद्वार बसवून दिले. त्यांच्या या आकर्षक भेटीमुळे ग्रामस्थांनी व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तांबोळी यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना शिक्षकेतर कर्मचारी रयत सेवक म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली. ३० वर्षांच्या सेवेत अवघी दोन वर्षे त्यांनी रांजणी येथील शाळेत सेवा दिली आहे. जवळपास सर्व सेवा गावात राहून प्रामाणिकपणाने बजावली. त्यामुळे या शाळेत त्यांचा सेवापूर्ती समारंभ मोठ्या थाटामाटात पार पाडला.
तांबोळी यांनी निवृत्त झाल्यानंतर शाळेसाठी योगदान देण्याची इच्छा आपल्या कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखविली. त्यांच्या मुलांनी सध्या शाळेकडे जी वस्तू नाही, व ज्या वस्तूचा अनेक वर्षे शाळेला उपयोग होईल, अशी वस्तू देण्याचे सुचवले. त्यावेळी तांबोळी यांच्या लक्षात आले की शाळेला सरंक्षक प्रवेशद्वार व्यवस्थित नाही. त्यातून अनेक भटकी जनावरे शाळेच्या आवारात येतात आणि शाळेत लावलेल्या झाडांचे नुकसान करतात. त्यातूनच तातडीने संरक्षक लोखंडी प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास नेले. या उपक्रमास विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक स्कूल कमिटी व ग्रामस्थांनी तांबोळी यांचे आभार मानले.
रयत सेवक हे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने शाळांना भरीव मदत करत असतात. समाजात देखील शाळेला मदत करणारे अनेक माजी विद्यार्थी आहेत. त्यातून ही शाळा भौतीकदृष्ट्या सक्षम होऊ लागली आहे. कला, क्रिडा याबरोबरच उत्तम शिक्षण व गुणवत्ता मिळविण्यासाठी विद्यार्थी पुढे येऊ लागले आहेत. शाळेला मदत करण्यासाठी समाजातून सौजन्याचा झरा पुढे यावा, अशी अपेक्षा प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी व्यक्त केली.
शाळेच्या आवारातील झाडे भरभरून वाढतील
या शाळेत ‘कमवा आणि शिका’ असे संस्कार केले गेले. गरीबीतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याच शाळेत रयत सेवक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. सेवेच्या काळात शाळेत अनेक प्रकारची झाडे लावून जगविण्याचा प्रयत्न केला. पण सरंक्षण भिंती व प्रवेशद्वार नसल्याने अनेक समस्या उभ्या राहिल्या. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर शाळेसाठी संरक्षक प्रवेशद्वार बांधले आहे. यामुळे शाळेच्या आवारातील झाडे जगविण्यासाठी मदत होणार आहे.
– अब्दुल तांबोळी, सेवानिवृत्त रयत सेवक, कवठे येमाई