पुणे : आजारपणाचा फायदा घेत सहा जणांनी निवृत्त मुख्याध्यापिकेची धायरी येथील जमीन कमी किमतीत विकून दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच आरोपींनी महिलेला धमकावून दहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणूक, तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका निवृत्त मुख्याध्यपिकेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ॲड. रवी सुरेश जाधव (रा. गल्ली क्रमांक पाच, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरुणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजित (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुख्याध्यपिका सॅलिसबरी पार्क परिसरात राहायला असून त्यांची जमीन धायरी परिसरात आहे. त्या शहरातील एका नामवंत शाळेत मुख्याध्यापिका होत्या. आरोपी ॲड. रवी जाधव याच्याशी त्यांची खटल्याच्या कामाकाजानिमित्त ओळख झाली होती.
ॲड. जाधवने साथीदारांशी संगनमत करून महिलेचे वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेतला. धायरी येथे असलेल्या जमिनीची किंमत कमी असल्याचे भासवून त्यांची दिशाभूल केली. धायरीतील जमिनीची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आरोपींनी ज्येष्ठ महिलेला संबंधित जमिनीची केवळ एक कोटी रुपयांत विक्री करण्यास भाग पाडले.
आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच रवी जाधव आणि अभिजित यांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महिलेला घराजवळ असलेल्या स्वीस कॅफेत बोलवून घेतले. ज्येष्ठ महिला दोघांना भेटण्यासाठी गेली, तेव्हा आरोपींनी त्यांना दहा लाख रुपये खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर करत आहेत.