पुणे : मराठा चेंबर ॲाफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरचे निवृत्त महासचिव डॉ. भा. र. साबडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. साबडे यांनी उद्योजक घडविण्याचे काम केले. त्यांनी लिहिलेली ‘गोष्ट पैसा फंडाची’ ‘ली आयोका’, ‘मोठी माणसं’ ही पुस्तके विशेष गाजली.
मराठा चेंबर ॲाफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नवीन उद्योग कसे उभे राहतील, मराठी तरुण उद्योजकतेकडे कसा वळेल, त्यासाठी सरकारी धोरणे कशी अनुकूल ठरतील, याचा अभ्यास करून मोठमोठे उद्योजक घडविले.
कनार्टकमधील जमखिंडी हे साबडे यांचे मूळ गाव. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या साबडे यांना मराठा चेंबर ॲाफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरमध्ये नोकरीची संधी मिळाली. आ. रा. भट, शंतनूराव किर्लोस्कर, राहुलकुमार बजाज, निळकंठ कल्याणी, एच. के. फिरोदिया, आबासाहेब गरवारे अशा अनेक उद्योगपतींचा त्यांना सहवास लाभला.