संतोष पवार / पळसदेव : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा-टप्पा २ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेत्या शाळांची यादी शालेय शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेते शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे.
जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल, त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २ हे अभियान ५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधी दरम्यान शाळांमध्ये राबविण्यात आले आहे. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
राज्य पातळीवरील निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय तसेच ८ विभाग पातळीवर निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय व बृहन्मुंबई आणि मनपा गट-अ व ब यांचे गटातून निवड झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय अशा एकूण ६६ शाळांना पुरस्कार प्रदान कार्यक्रम राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व मा. मंत्री (शालेय शिक्षण) महाराष्ट्र राज्य, यांचे हस्ते १४ ऑक्टोबर रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस (एनसीपीए), एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईट. मुंबई ४०००२ येथे आयोजित करण्यात आलेला आहे.