भोसरी : पिंपरी-चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, याच बालेकिल्ल्याला शरद पवार यांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
विशेष म्हणजे उद्याच 17 जुलैला शरद पवार गटात या सर्वांचा शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार गटात मोठी पडझड होताना दिसत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड मध्ये धक्क्यावर धक्के बसत आहेत. मंगळवारी शहरातील 25 माजी नगरसेवकांना सोबत घेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. 25 माजी नगरसेवकांसह विद्यार्थी, युवकच्या पदाधिकाऱ्यांनी ही राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकचे वेध लागल्याचे दिसत आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवड मधील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच आपल्या मतदारसंघांमध्ये सर्वे करून घेतले आहेत. ज्यामध्ये अजूनही शरद पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट असल्याचे दिसून आले, त्याचीच परिणीती पक्षप्रवेशात दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्शवभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना शरद पवार यांनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.