पुणे : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे एका शेतकऱ्याच्या कालवडीचा पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. याबाबतची माहिती शिक्रापुरच्या वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याच्या हल्यात मृत्यू झालेल्या कालवडीचा रेस्क्यू टिमने तातडीने पंचनामा केल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे रेस्क्यू टिमला असा पंचनामा करण्याचे अधिकार आहेत का? याबाबतच्या चर्चा शिरूर तालुक्यात जोर धरू लागल्या आहेत.
तसेच वृत्तपत्रांमध्ये रेक्यु टीमचे पंचनामा करतानाचे फोटो छापुन आले आहेत. मात्र, वनपाल गौरी हिंगणे आणि वनरक्षक प्रमोद पाटील हे फोटोत दिसत नाहीत. तसेच ते घटनास्थळी उपस्थित नव्हते, काही ग्रामस्थ व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. मग हे अधिकारी अदृश्य पध्दतीने रेस्क्यू टिमला मार्गदर्शन करत होते का? तसेच कालवडीचा पंचनामा करण्यासाठी रेस्क्यू टिमची नेमणुक कोणाच्या आदेशानुसार केली. याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.
वनपाल यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
शिक्रापुर वनहद्दीत अनेक कोळशाच्या भट्ट्या आहेत. तसेच शिक्रापुर वनपाल गौरी हिंगणे यांच्या कार्याक्षेत आलेगाव पागा आणि उरळगाव येथे राखीव वनहद्दीत जेसीबीच्या साहाय्याने झाडे काडली. तसेच वनहद्दीतील शेकडो ब्रास माती गौण खनिज माफीयांनी वनपाल यांच्याशी संगनमत करुन नेली. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाने उशीरा गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन देखील गुन्ह्यात वापरलेली संपुर्ण यंत्र सामुग्री गौरी हिंगणे यांनी जप्त केली नाही. तसेच गुन्ह्यातील आरोपींना अटकही केलेली नाही.
रेस्क्यू टिम म्हणजे काय?
स्वयंस्फूर्तीने काही तरुण वनखात्याला मदत करतात. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उचलण्यासाठी मदत, वन्यप्राण्यांच्या संदर्भात काही घटना घडली. तर वन अधिकारी यांच्या समवेत जाऊन मदत करणे. रेस्क्यू टिमच्या तरुणांकडे वनविभागाचे ओळखपत्र आणि गणवेश असतो. मात्र, या टिम मधील सदस्य शासकीय कर्मचारी नसून त्यांना कुठलाही पंचनामा करण्याचा अथवा अहवाल पाठविण्याचा अधिकारही नाही. त्यामुळे शिक्रापूर वनपाल गौरी हिंगणे आणि तळेगाव ढमढेरेचे वनरक्षक प्रमोद पाटील यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली आहे.