ओतूर, (पुणे) : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कत्तलीसाठी चालविलेल्या ७१ म्हशींची सुटका करण्यात ओतूर पोलिसांनी यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच ट्रकसह ७१ जनावरे ताब्यात घेतली असून सात जणांना अटक केली आहे.
ही कारवाई ओतूर येथील खुबी परिसरात केली असून पोलिसांनी ६० लाख ४० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. ताब्यात घेतलेली जनावरे देखभालीसाठी जिवदया मंडळ गोशाळा, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी दिली.
याप्रकरणी ओतूर पोलिसांनी मोहम्मद बकौल इकरार खान (वय-६४, रा. अमरपूर, ता. सियाना, जि. बुलंद), तोहीत वाहीद कुरेशी (वय-४५, रा. शिवाजीनगर, मुंबई), उस्मानखान रमजानखान (वय-६०, रा. गोवंडी, मुंबई), रशीद अब्दुल रहीम शेख (वय-३२. रा. गोवंडी, मुंबई), फिरोज सोहराब मलीक (वय-४३, रा. ब्रहानाधुगरासी, ता. सियाना, जि. बुलंद), फारूक कुरेशी (रा. फलटण जि. सातारा), मोहम्मद बिलाल भाईमिया शेख (रा. शिवाजीनगर, कुर्ला, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल यावर प्रतिबंध करण्याबाबत जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ओतूर पोलिसांनी खुबी येथे नाकाबंदी केली होती.
वाहन तपासणीदरम्यान ५ ट्रकचे पाठीमागील हौद्यात एकूण ७३ म्हैस दाटीवाटीने बांधून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. जनावरांचे वाहतुकीचा परवाना नसताना, वैद्यकीय अधिकारी यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र नसताना ही जनावरे मुंबई येथे कतलीसाठी नेण्यात येत होती. यामधील २ जनावरे ट्रकमध्येच मृतावस्थेत आढळली. उर्वरित ७१ जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.