लोणी काळभोर (पुणे): पुणे-सोलापुर महामार्गावरुन हडपसर ते लोणी काळभोर या दरम्यान तुम्ही जर चारचाकी अथवा दुचाकीवरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. आता या रस्त्यावर जागोजागी पांढरे पट्टे मारण्याचे, तर दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध असणारी झाडे-झुडपे काढण्याचे काम सुरु आहे. बरं एवढंच नाही तर चक्क रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामही सुरु असल्याचे तुम्हाला दिसेल. हे सर्व पाहुन कदाचित तुम्हाला मोठा मानसिक धक्का बसण्याची शक्यताही आहे. पुढे जाऊन तुम्हाला वाटेल की, यासाठी तर आपण इतके दिवस बोलत होतो, भांडत आहोत म्हणून सरकारने वैतागून हे काम सुरु केले असेल. पण, तसं नाहीये. याचं एक टक्काही श्रेय तुम्हाला घेता येणार नाही. कारण ही कामं तुमच्या रेट्यामुळे नाही तर मंत्री महोदय येणार म्हणून सुरु आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. त्यांनीही भली मोठीमोठी आश्वासने दिली. पण ,कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. पण, आता हेतुम्हाला वाटेल असं अचानक घडलंय काय? ज्यामुळे एकदम वेगात ही रस्त्याची कामे सुरु आहेत. त्याच कारण असं की, लोणी काळभोरमधील एका कार्यक्रमात मंत्री महोदय येणार आहेत आणि तेही केंद्रीय रस्ते वाहतूक- महामार्ग विभागाचे. मग, काय ठरल्याप्रमाणे आपले अपयश झाकण्यासाठी अधिकारी एकदम जागे झाले अन कामाला लागले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी लोणी काळभोरला एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. केंद्रीय मंत्री येणार असल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याची डागडुजी करण्यास बुधवारी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे एखादा केंद्रीय मंत्री आल्यावरच पुणे-सोलापूर महामार्गाची डागडुजी होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खरं तर नितीन गडकरी हे एकदम सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे कामही धडाकेबाज आहे. त्यांनी वाशीममधील एका कार्यक्रमात बोलताना ‘रस्ता खराब झाला, तर मी काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली टाकेन,’ असा दम भरला होता. गडकरींना सोलापूर-पुणे रस्त्याचा काॅन्ट्रॅक्टर सापडत नाही का, असा प्रश्न आहे. या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे, त्यामुळे गडकरी या काॅन्ट्रॅक्टरला बुलडोझरखाली कधी टाकणार? असा प्रश्न लोणी काळभोर येथील नागरिक करत आहेत.
टोलनाका बंद झाल्यापासून रस्त्याची अवस्था बिकट
कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यानचा टोल बंद झाल्यापासुन, या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. या महामार्गावर दिवसेंदिवस अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना कायमस्वरूपीचे अपंगत्व आलेले आहे. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी जाळ्या, लाईट कटिंग बॅरिअर्स तुटलेल्या अवस्थेत आहेत. सेवा रस्त्यावर पाणी, मातीचे मोठमोठे ढीग साचले आहेत. रस्त्यावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच वाहतुक कोंडी ही बाब तर सततची बनलेली आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरावस्थेत असल्यामुळे या मार्गावरील नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी लोणी काळभोर येथील एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यामुळे या रस्त्याची थोडीफार डागडुजी करण्यात आली. अनेक वर्षांपासून मागणी करूनही दुरुस्त न झालेला रस्ता यानिमित्ताने का होईना दुरुस्त झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी मंत्री महोदय वारंवार यावेत, असे मत व्यक्त केले आहे.
आमदार, खासदार फक्त नावालाच
खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे दोघेही मागील चार वर्षाच्या काळात नगर, नाशिक या रस्त्यांची दुरुस्ती व त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलत असतात. मात्र, दोघांनीही मागील चार वर्षाच्या काळात पुणे-सोलापुर महामार्गावरील हडपसर ते कासुर्डी या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केल्याचेही कोणालाही दिसुन आले नाही. तर दुसरीकडे राज्य सरकारमधील कोणीही या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बोलायला तयार नाही. कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यानचा टोल बंद झाल्यापासुन, या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी वेळोवेळी मागण्या केल्या आहेत.