पुणे : पद्मभूषण पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या मृत्यूचे खरे कारण असून समोर आले नसून त्यांच्या कपाळावर जखम झाल्याचे आढळून आले आहे.
वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
वाणी जयराम यांनी नुकतीच व्यावसायिक गायिका म्हणून संगीत क्षेत्रात ५० वर्षे पूर्ण केली होती. वाणी यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. वाणी जयराम यांनी आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबतही काम केले होते.
वाणी जयराम यांनी विविध उद्योगांमधील काही मोठ्या संगीतकारांसोबत सदाबहार गाणी गायली आहेत. या प्रतिभावान गायिकेने तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया भाषेतील अनेक गाणी गायली आहेत.
त्यांनी देशात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर कामगिरी केली आहे. उल्लेखनीय आहे की तिने तीनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा येथून राज्य पुरस्कारही मिळाले आहेत.