दीपक खिलारे
इंदापूर : महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन इंदापूर दूधगंगा दूध उत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.
राज्यातील शेतकरी संकटात असून, सर्वत्र दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडला होता. त्या अनुषंगाने राजवर्धन पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासमवेत राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व दुग्ध विकास अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, दूध दरवाढ करुन दूध उत्पादक शेतकरी वर्गाला संकटातून बाहेर काढण्याची मागणी केली होती.
त्यानंतर राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संघामार्फत संकलित करण्यात येत असलेल्या दुधाला ५ रुपयांचे अनुदान देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३:२ फॅट आणि ८:३ एस.एन.एफ. साठी प्रति लिटर २९ रुपये दूध दर शेतकऱ्याच्या बँक खात्यावर रोख जमा करणे बंधनकारक आहे, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रति लिटर ५ रुपये अनुदान बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे शासनाने केलेली घोषणा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंददायी असल्याचे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने राजवर्धन पाटील यांनी मानले.
तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मानले पाटील पिता-पुत्राचे आभार!
एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे दूधाला मिळत असलेल्या अल्प भावामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रत्यक्षात भेट घेवून, दूध उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूधाला ५ रुपये अनुदान जाहीर केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांच्या मागणीला यश आल्याचे सांगून शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.