पुणे : पुणेकरांना मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच उन्हाच्या झळांनी हैराण केले होते. मात्र, आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाच्या तडाख्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुण्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर भागात आज (ता. २३) ११.७ अंश सेल्सिअस, एनडीए ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वारा शांत आहे, त्यामुळे पुढील काही दिवस किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत आकाश निरभ्र राहील आणि उत्तरेकडील वारे पुणे आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात प्रवेश करतील. यामुळे तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होईल. पुण्यातील तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने घट होऊन ते १० अंश सेल्सिअस किंवा त्याखाली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर येथे १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. २० फेब्रुवारीला ते १३ अंशांपर्यंत घसरले. गेल्या चोवीस तासात एक अंश सेल्सिअसने घसरलेल्या कमाल तापमानातही काहीशी घट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान काही ठिकाणी १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. हवेली तालुक्यात किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस, शिरूर आणि एनडीए भागात ११.१ अंश सेल्सिअस होते.
पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. २५ आणि २६ फेब्रुवारी रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.