पुणे : म्हाडा पुणे विभागाकडून २० टक्के योजनेंतर्गत १ हजार ७०० घरांची सोडत काढण्यात येणार असून या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली आहे. काही दिवसातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
आचारसंहितेच्या आधी म्हाडाच्या घरांसाठी सोडत प्रक्रिया सुरू करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. या कालावधीमध्ये अर्ज मागवणार आणि त्यानंतर सोडत केली जाणार आहे. आचारसंहितेच्या कालावधीचा असा उपयोग म्हाडा पुणे मंडळाकडून केला जाणार असल्याचे देखील म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.
सामान्यांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी पुण्यात आता सरकारी किंवा म्हाडाच्या मालकीच्या जागा राहिल्या नाहीत. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रहिवाशी क्षेत्रासाठी जागा आरक्षित आहेत. त्यापैकी काही जागा मिळविण्याचा म्हाडाचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत पत्रव्यवहारही सुरू आहे. असं मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितलं.