राहुलकुमार अवचट
यवत : कासुर्डीमधील (ता. दौंड) मौजे कामटवाडी येथे पुनर्वसनासाठी आरक्षित असलेल्या जागेवर गेल्या ४० वर्षांपासून नंदीवाले समाजाची सुमारे ६० ते ६५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे गरीब व भूमिहीन आहेत. त्यांची निवासी अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
दरम्यान, भूमिहीनांची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, नंदीवाले समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने सहानुभूतीने विचार करावा व सदर निवासी अतिक्रमणे नियमित करावीत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली. या वेळी बैठकीस आमदार जयकुमार गोरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, जिल्हा पुनर्वसन अधिकारी विवेक जाधव, दौंडचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.