पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्यात ६ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाचे १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या व मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव नोंदणी केली नसलेल्या नागरिकांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवा, तसेच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला आहे. ६ ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २० ऑगस्ट २०२४ पर्यंत राबविला जाणार आहे. नागरिकांना या मुदतीपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे.
१ ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकांना या कालावधीत मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच ज्या मतदारांची नावे वगळली गेलेली आहेत अथवा ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत अशा नागरिकांनी नमुना अर्ज क्रमांक ६ भरून आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावीत.
ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी मतदारांनी https://voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तर आपली नावे मतदार यादीमध्ये शोधण्यासाठी https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. मतदार यादीसंदर्भात काही माहिती आवश्यक असल्यास अथवा काही दुरूस्ती असल्यास जिल्हा निवडणूक कार्यालयात तसेच संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.