मंचर (पुणे): अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील गावात उत्तर प्रदेश, बिहार, बांगलादेश येथील परप्रांतीय नागरिकांनी स्थानिक ग्रामस्थांचा आधार घेऊन सलून व्यवसाय, भंगार व्यवसाय सुरु केला आहे. उत्तरप्रदेश येथील सलून व्यवसाय करणाऱ्या तरुणाने गावातील स्थानिक मुलीची छेड काढल्याची घटना घडली असून स्थानिक तरुणांनी परप्रांतीय तरुणास चोप दिल्यानंतर सदर तरुण रात्रीतून पळून गेला आहे. यासाठी गावात राहणाऱ्या परप्रांतीयाने भाडेकरार करणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात आले असून त्यांच्यामुळे गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावांमध्ये परप्रांतीयांकडून महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. स्थानिक रहिवाशी दोन तीन हजारांच्या भाड्याकरिता परप्रांतीयांकडून कोणतेही ओळखपत्र आधार कार्ड न घेता गाळे भाड्याने देतात. मालकाने भाडेकरार करून देणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामपंचायतीने याबाबत पोलीस ठाण्यात माहिती देऊन सदर गाळा मालक व खोली मालकाला पुरविण्यात येणाऱ्या सुविधा बंद कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहे.
याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ म्हणाले, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक गावात परप्रांतीय नागरिक उद्योग, व्यवसाय करता रहिवासी आहेत. घरमालक व गाळेमालकांनी परप्रांतीयांना गाळे व खोल्या भाडेकरार करून देणे बंधनकारक राहील. भाडे कराराची एक प्रत मंचर पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला देणे बंधनकारक राहील. अन्यथा गाळे मालक यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिला आहे.