पुणे : किरकोळ वादातून हॉटेलच्या वेटरच्या डोक्यावर प्रहार करून खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडल्याची घटना ताजी असतानाच पुण्याच्या मध्यवर्ती सदाशिव पेठ परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळणार नाही असे सांगितल्याच्या कारणावरुन दोघांनी हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच हॉटेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील मारहाण करुन हातातील हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. सदाशिव पेठेतील जयश्री पाव भाजी सेंटर येथे सोमवारी (ता. १८) रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
याबाबत यशराज सुभाष भोसले (वय-२९, रा. रोहन कृतीका बिल्डिंग, सिंहगड रोड, पुणे) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) फिर्याद दिली आहे. तर शुभम प्रमोद शिंदे, ओमकार शिंदे यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यशराज भोसले यांचे सदाशिव पेठेत जयश्री पावभाजी सेंटर आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्य़ादी व त्यांचे कामगार पाव भाजी सेंटर बंद करुन साफसफाई करत असताना आरोपींनी कामगारांसोबत वाद घालून फिर्य़ादीकडे ‘आम्हाला जेवण मिळेल का?’ अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्य़ादींनी आरोपींना हॉटेल बंद झाल्याचे सांगितले.
हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्याचा राग अनावर झाल्याने आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घालून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी ओमकार शिंदे याने सोबत आणलेल्या धारदार हत्याराने भोसले यांच्यावर वार करुन गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कामगारांना देखील मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हातातील धारदार शस्त्र हवेत फिरवून दहशत निर्माण केली.