पुणे : गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि समाजात दहशत (Pune Crime) निर्माण करणाऱ्या कृत्यांवर पुणे पोलिसांनी नजर असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. याचदरम्यान कुख्यात आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर ‘रिल्स’ आणि स्टेटस अपलोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच तरुणांची धिंड काढली असून, या तरुणांवर गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ “Badla to fix, reply hoga. Aata fakt body moza kutryano” (बदला तर फिक्स, रिप्लाय होईल आता फक्त बॉडी मोजा) अशा आशयाचे आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे स्टेटस आणि स्टोरीज अपलोड केल्या होत्या.

याप्रकरणी पोलिसांनी मंथन सचिन भालेराव, फैजान शेख, पियुष बिडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगु या पाच आरोपींना अटक केली असून, समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे.








