पुणे : गुन्ह्यात मदत करावी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षकला 2 हजाराची लाच देणाऱ्या एका रिअल इस्टेट एजंटला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताडीवाला रोड पोलीस चौकीत गुरुवारी (ता. 26) केली आहे.
हसनअली गुलाब बारटक्के (वय 45, रा. सरस्वती कृपा हौसिंग सोसायटी, ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नंदकुमार कदम हे सहाय्यक पोलीस निरीक्षक असून ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर आरोपी हसनअली बारटक्के हा एक रिअल इस्टेट एजंट आहे. बारटक्के याच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास यातील तक्रारदार लोकसेवक नंदकुमार कदम यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात नंदकुमार कदम यांनी मदत करावी म्हणून आरोपी हसनअली बारटक्के याने तक्रारदार यांना लाच देण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. परंतु, तक्रारदार लोकसेवक कदम यांनी लाच न स्वीकारता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, दाखल गुन्ह्यात मदत करण्याकरिता लोकसेवक नंदकुमार कदम यांना 2 हजाराची लाच देताना आरोपी हसनअली बारटक्के याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.