लोणी काळभोर : भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्टोबर ही त्यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. हेच विशेष औचित्य साधून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणादिन मंगळवारी (ता. १५ ) साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
विद्यालयात सर्वात प्रथम डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य सीताराम गवळी यांच्या हस्ते करून वाचन प्रेरणादिनाची सुरवात करण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख दयानंद जानराव, ज्येष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे, कल्पना बोरकर, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य सीताराम गवळी म्हणाले की, ‘वाचाल तर वाचाल’ अशी एक म्हण आहे. जी खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण ठरत आहे. आयुष्य कसं जगाव यासाठी तर पुस्तक दिशादर्शक ठरतातच. मात्र, खडतर जगणं सुसह्य करण्यातही पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो. वाचलेले एखादे पुस्तकही आयुष्य बदलून टाकू शकते. त्यामुळे आपण भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन प्रेरणादिन साजरा म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
दरम्यान, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर भाषण करून त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. काही विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. तर काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाचनाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी विद्यायाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.