यवत: दौंड तालुक्यात राहु बेटातील टाकळी व पाटेठाण गावचे तलाठी कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत रयत शेतकरी संघटनेच्या वतीने दौंड तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार ममता देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
टाकळी व पाठेठाण या ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयात तलाठी हे कार्यालयात वेळेत उपलब्ध नसल्याने नागरिकांना दैनंदिन कामे सोडून वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. सध्या अनेक विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले व इतर कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांसह शेतकरी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना संबंधित ठिकाणी तलाठी कार्यालयात शासकीय वेळेत पूर्णवेळ तलाठी यांना हजर राहण्यासाठी सूचना द्याव्यात अथवा नवीन तलाठ्याची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी रयत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कायदे सल्लागार अध्यक्ष बबनराव गायकवाड, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अंकुशराव हंबीर, दौंड तालुका महिला आघाडी सरचिटणीस माधुरी वडघुले, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्यासह दौंड तालुक्यातील रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.