पुणे : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीच्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून पुण्यात रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरु झालं आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागुल चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. ‘मी कोणाच्याही चपला उचलणार नाही’. राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात, मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? असा सवाल आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आबा बागुल यांना पुणेकरांनी सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. पण, तरीदेखील मला डावललं जात आहे. माझ्यात काय कमी होती, अशी विचारणा आबा बागुल यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केली आहे. सध्या विद्यमान आमदार असताना धंगेकरांना लोकसभेचं तिकीट देणं कितपत योग्य आहे, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. पुणे काँग्रेसमध्ये या निर्णयामुळे खदखद आहे. निष्ठावंतांवर अन्याय करुन नुकत्याच पक्षात आलेल्यानां उमेदवारी देऊन काय साध्य केलं? असा सवाल देखील आबा बागुल यांनी केला आहे.
पक्षश्रेष्ठींना आम्ही कळवलं आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. आम्ही महात्मा गांधींना मानणारे आहोत. लोकशाही मार्गाने काँग्रेसभवनवर कँडल मार्च काढणार असल्याचा इशारा देखील आबा बागुल यांनी यावेळी दिला आहे.