पुणे : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केलं आहे. त्यावरुन आमदार रविंद्र धंगेरकर यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ड्रग्स कारवाईसाठी पुणे पोलिसांना २५ लाखांचं बक्षिस देऊन देवेंद्र फडणवीस हे गृहखात्याचं अपयश लपवत आहे. एवढंच होतं तर यापूर्वी हे ड्रग्स का नाही सापडलं, असा सवाल रविंद्र धंगेरकर यांनी उपस्थित केला आहे.
रविंद्र धंगेरकर म्हणले, ललित पाटीलकडे ज्यावेळी मोठया प्रमाणात ड्रग्स सापडले होते. त्यावेळी त्याला अटक केली होती, मात्र संजीव ठाकूरला अटक करण्यात आली नाही. संजीव ठाकूरलादेखील अटक करायला हवी होती. तेव्हापासून पुण्यात डग्स रॅकेटची चर्चा आहे. संजीव ठाकूर यांना अटक करण्यासाठी गृहखात्याला पत्र दिलं होतं. मात्र अजूनही त्यांना अटक केली नाही. याचा अर्थ या प्रकरणात भाजपच्या नेत्यांचा काहीतरी संबंध आहे.
त्यासोबतच पुण्यात मागील दोन दिवसात ४००० कोटींचं ड्रग्स सापडलं. पण मागील वर्षभरापासून ड्रग्स रॅकेटचा खुलासा करा, त्याची पाळेमुळे शोधून काढा, याची मागणी आम्ही करत आहोत. मात्र आताच हे ड्रग्स कसे सापडले. जर हे ड्रग्स आता सापडले तर वर्षभर तपास यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न मी पुणे पोलिसांना विचारला होता. त्यानंतर काल फडणवीसांनी आपलं अपयश लपवण्यासाठी २५ लाखांचं बक्षिस जाहीर केलं, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
कुरकुंभमध्ये असणारा ड्रग्सच्या कारखान्याचा मालक कोण आहे. त्याचा शोध घेतला पाहिजे. हा कारखाना दोन दिवसांत नाही तर अनेक वर्षांपासून सुरु होता. त्यामुळे यापूर्वी या कारखान्याची माहिती कशी कोणाला समजली नाही. शिवाय संदिप धुनियाचा पोलीस शोध घेत आहेत. त्याला २०१६ मध्येही अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला जामीन कसा मिळाला,असे अनेक प्रश्न रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत.