राजू देवडे
लोणी धामणी : आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार संघटनेने आंबेगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या वेळी आंबेगाव तालुक्यातील रेशनिंग दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील सुमारे ६० वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या व दुष्काळ, साथीचे आजार, भूकबळी कोविड यासारख्या जागतिक महामारीच्या काळात अतिशय प्रभावीपणे केंद्र व राज्य शासनाचा एक हक्काचा घटक म्हणून तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहचणारी व्यवस्था म्हणून रेशन वितरण व्यवस्था यशस्वी ठरली आहे. मात्र, रेशन वितरण व्यवस्थेचा प्रमुख घटक असणाऱ्या दुकानदारांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : रेशन दुकानदारांना निश्चित उत्पन्नाची हमी, धान्याबरोबरच डाळ, तेल सुरू करावे, डी.बी.टी. सुरू करु नका, अनेक वर्षांपासून बंद असलेली केरोसीन दुकाने पूर्ववत सुरू करावे, अन्नधान्य चांगल्या दर्जाच्या ज्यूट बॅगमधून देण्यात यावे, कालबाह्य झालेली इ-पॉस मशीन बदलून अत्याधुनिक मशीन मिळावी, महागाई वाढल्याने त्याप्रमाणात कमीशन वाढवून मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय नागटिळक यांनी स्विकारले.
अत्याधुनिक इ-पॉस मशीन मिळाव्यात
गेली अनेक वर्षांपासून रेशनिंग दुकानदार तुटपुंज्या कमीशनवर दुकान चालवत आहेत. त्यामध्ये दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्य वितरणासाठी शासनाने दुकानदारांना इ-पॉस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत; परंतु त्या मशीन देखील कालबाह्य झाल्या आहेत. नवीन अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून द्याव्यात व शासनाने रेशनिंग दुकानदारांच्या मागणीकडे लक्ष द्यावे.
– सुरेश रामचंद्र घोलप, अध्यक्ष, रेशनिंग दुकानदार संघटना, आंबेगाव तालुका