दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वैदवाडी – कर्दनवाडी ते मानकरवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी इंदापूर-बारामती रस्त्यावर चिखली फाटा येथे बुधवारी (ता.११) रास्ता रोको आंदोलन केले.
वैदवाडी (लहिरोबानगर) , कर्दनवाडी, नलवडेवस्ती, मोहितेवाडी व मानकरवाडी या पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे गेल्या वीस वर्षांपूर्वी काम झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या रस्त्याची कसलीही दुरुस्ती न झाल्याने रस्त्याची खडी उचकटून रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत.
त्यामुळे नागरिकांना आठवडे बाजार, शेतमाल नेण्यासाठी, दूध नेण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाणेसाठी अडचण निर्माण होत आहे.
या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा विनंती करुनही विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे व राज्यकर्त्यांकडून मिळालेल्या पोकळ आश्वासनामुळे गावातील नागरिकांनी राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.