शिरूर: शिरूर हवेली तालुक्यात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा महायुतीकडून प्रचार जोरदारपणे सुरू असून समोरील महविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांनीही प्रचार सभांमधून रान पेटवले आहे. दोन्ही गटाकडून मतदारसंघात सध्या बेरजेचे राजकारण सुरू आहे. पण, दुसरीकडे महायुतीमध्ये महादेव जानकर यांचा रासप पक्ष हा शिरूर हवेली मतदारसंघात नाराज असल्याचे रासपचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
याचे कारण विचारले असता कार्यकर्ते म्हणाले की, शिरूर मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारे प्रचार यंत्रणेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले गेले नाही. महादेव जानकर यांच्या सभेची कुठल्याही प्रकारची कल्पना किंवा निमंत्रण महायुतीचे उमेदवार अथवा कार्यकर्त्यांकडून दिले जात नाही. आमची भुमिका सकारात्मक असूनही जर जाणुन बुजुन डावलण्यात येत असेल, तर आम्हाला ही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा रासपच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
शिरूर हवेली तालुक्यात रासपचे मोठे जाळे
शिरूर हवेली मतदारसंघात रासपची चांगली ताकद असून धनगर समाजाचे निर्णायक मतदान या मतदारसंघात आहे. तसेच धनगर समाज बहुल भागातील गावांमध्ये रासपच्या कार्यकर्त्यांचे चांगले जाळे असून वाडे बोल्हाई पंचायत समिती गणात पक्षाची ताकद मागील निवडणुकीत पाहायला मिळाली होती. त्यामुळे आगामी काळात रासपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं हे महायुतीसाठी गरजेचे आहे, असे जाणकार सांगतात.
मी जानकर साहेब यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असुन साहेबांची प्रत्येक भुमिका मला मान्य असेल. परंतु, महायुतीच्या नेत्यांकडून मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेणे म्हणजे त्या कार्यकर्त्यांचा नाही तर त्या पक्षाचा अपमान आहे. मित्र पक्षांचा फक्त मतापुरता वापर न होता सर्व प्रकारे यंत्रणेत सहभाग व पुढील काळात सत्तेत वाटा मिळावा ही आमची भुमिका आहे. विचारात न घेतल्यास तालुका पातळीवर पक्षाच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन पत्रकार परिषदेत घेऊन योग्य भुमिका स्पष्ट करु.
भरत गडदे अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष हवेली तालुका