केडगाव: दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रश्मी संगितकुमार शितोळे या तरुणीने मेहनतीच्या जोरावर यूपीएससी क्लीयर करून मोठे यश संपादन केले आहे.
जिद्द, चिकाटीच्या जोरावर अपयशाला न डगमगता यूपीएससीत (इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसेस) राज्यात प्रथम तर देशात ती अकरावी आली आहे. या यशामुळे सर्व तालुक्यातून रश्मी शितोळे हिच्यावर कौतुकासह शुभेछांचा वर्षाव होत आहे. सद्गुरू विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर रश्मीने अकरावीला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अकरावी बारावीला विज्ञान शाखेत शिक्षण घतले. त्यानंतर कला शाखेत प्रवेश घेऊन पद्वित्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानतंर तिने तुशांत यादव, निशांत मेहरा, सनद श्रीवास्तव या मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घेऊन यूपीएससीचा अभ्यास सुरू केला.
यूपीएससी परिक्षा देताना तिला दोन वेळा अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु किंचितही न डगमगता तिने जिद्द सोडली नाही.
कोरोना काळात सर्व काही ठप्प झाले होते. तिचे यूपीएससीचे तासदेखील बंद पडले होते. त्यावेळी अभ्यास वाढवत रश्मीने घरी 11 तास अभ्यास केला, आणि तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली. रश्मी हीची सेवा केंद्रीय अर्थमंत्रालय येथे असणार आहे.
याअगोदर देखील या देऊळगाव गाडा येथील 3 अधिकारी उच्च पदावर विविध ठिकाणी कार्यरत आहेत. त्यानतंर रश्मी शितोळे हिने मिळवलेल्या यशाचे सर्व तालुक्यातून कौतुक होत आहे. शेतकऱ्याची मुलगी असल्याने सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे.
आमचे देऊळगाव गाडा हे दुष्काळी गाव असेल, तरी येथील तरुण मात्र नक्कीच विविध शेत्रात आमच्या गावचा झेंडा मिरवत आहेत. येथील महेश शितोळे (तहसीलदार), आरती पवार (पोलिस उपअधिक्षक), विकास जाधव (सहायक कर निरीक्षक) असे विविध ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी कार्यरत आहेत. याचा सर्व गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे.
-संगीतकुमार शितोळे (रश्मी शितोळे चे वडील)