निमसाखर : निमसाखर (ता. इंदापूर) येथे दुर्मिळ आणि विषारी वाळ्यासारखा दिसणारा लाजाळू पोवळा या जातीचा सर्प आढळला आहे. हा सर्प महाराष्ट्रासाहित संपूर्ण भारतभर आढळत असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत हा सर्प समाविष्ट आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये खरीप हंगामातील बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. अशातच निमसाखर (ता. इंदापूर) येथील खंडोबानगर येथे दिगंबर खंडेराव पवार यांच्या घरासमोर काढलेली बाजरी वाळवण्यासाठी उन्हात टाकत असताना वाळ्यासारखा रंगाने काळा दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा हा साप बाजरीच्या कणसात आहे, अशी माहिती निमसाखर येथील सर्पमित्र अमित आडसूळ यांना मिळाली. संबंधित ठिकाणी पाहणी करून हा सर्प काही वेळातच पकडण्यात आडसूळ यांना यश आले.
या सर्पाविषयी निमसाखरचे अमित आडसूळ म्हणाले की, हा पोवळा जातीचा सर्प दुर्मिळ असून काळ्या रंगाचा लांब, जाडीने कमी, विषारी असतो. या सापाचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिस्तातात. चावलेल्या भागात वेदना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. मात्र, आकाराने लहान असल्याने हा साप अन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडतो. हा साप लाजाळू असून दगड-मातीमध्ये याचे वास्तव्य असते. महाराष्ट्रासाहित संपूर्ण भारतभर हा सर्प आढळत असून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वन्यजीवांच्या वर्गवारीत हा सर्प समाविष्ट आहे.