पुणे : पुणे शहरात झिका व्हायरससह डेंग्यू रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. पावसामुळे डांसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही काळात झिका व्हायरससह डेंग्यूच्या रूग्णांची संख्या डोकेदुखी ठरत असून, राज्यभरात झिकाचा धोका वाढतचं चालला आहे. झिकाची रुग्णसंख्या तब्बल २५ वर पोहोचली आहे. तर सर्वाधिक म्हणजे २३ रुग्ण पुण्यात आढळले आहेत.
पुण्यापाठोपाठ कोल्हापूर मध्ये एक आणि संगमनेरमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती महिला आणि तिच्या गर्भाला असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने जास्त भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती महिलांचे आहे.
झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत जास्त वाढ दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली असून, याचं पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी नागरिकांना दिला आहे. या जुलै महिन्यात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत, तर त्यातील १५६ रुग्ण हे या आठवडाभरातील आहेत. झिका व्हायरस बरोबर, डेंग्यूच्या रूग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत चालली आहे .
जून महिन्यात झिकाचे २१ रुग्ण
पुणे शहरात जून महिन्यात झिका व्हायरसचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर आता शहरातील झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. यामध्ये दहा गर्भवती महिलांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील सासवड, मुळशीतील भूगाव या भागात झिकाचा प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळून आला आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना आणि तिच्या गर्भाला असतो. त्यामुळे गर्भावातींच्या चाचण्या आणि तपासणीवर महापालिकेकडून
जास्त भर दिला जात आहे.
जुलै महिन्यात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण
पुण्यात जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. यामधील ५ रूग्णाचे डेंग्यूचे निदान झाले आहे. गेल्या महिन्यात संशयित रुग्णांची संख्या १५७ होती, तर निदान झालेला केवळ १ रुग्ण होता. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या काळात दर महिन्याला संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी होती. जानेवारीमध्ये ९६, फेब्रुवारीमध्ये ७५, मार्चमध्ये ६४, एप्रिलमध्ये ५१ आणि मे महिन्यामध्ये ४४ अशी रुग्णसंख्या होती.
दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यामुळे जून महिन्यापासून डेंग्यूच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. शहरात या वर्षात डेंग्यूचे ७०३ रुग्ण आढळून आले आहेत, तर निदान झालेले १५ रुग्ण आहेत.