पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे.
नेमकं काय घडलं?
इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेली तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर फिरत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना एकटे गाठून धमकावत आडबाजूला नेले. तसेच आरोपींनी त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेत मित्राला मारहाण केली. त्याचा शर्ट काढून त्याचे हात बांधले. तसेच बेल्टने पाय बांधले आणि त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच कोयता, लाकडी बांबू आणि धारदार चाकूचा धाक दाखवत मित्राला जीवे ठार मारण्याची धमकी देत तरुणीवर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित मुलीने बहिणीला घडलेला सर्व प्रसंग सांगितलं. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे प्राथमिक उपचार घेऊन मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तीस तास उलटूनही आरोपींचा ठावठिकाणा नाही
दरम्यान, तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडून तीस तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. पुणे पोलिसांची जवळपास २५ पथके वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा याच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्ब्ल दहा किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत.
View this post on Instagram