पुणे : पुण्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून महिला आणि तरुणींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सांगवीत एका 30 वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 30 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्या फिर्यादीवरून समाधान मोहन येडके (वय-33 सध्या रा. कात्रज, मुळ रा. गणेश नगर, ता. जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत वाघोली आणि सांगवी परिसरात घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आणि फिर्यादी तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. समाधानने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वाघोली आणि सांगवी येथील लॉजवर घेऊन गेला. बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी पीडितेने लग्नासाठी दबाव टाकला असता आरोपीने स्पष्ट नकार देत तिला मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.