केडगाव, (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील रमाबाई मुक्ती मिशन संस्थेबाबत सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरु आहे. या संस्थेच्या विविध संदर्भात चौकशी सुरु असतानाच आता पुन्हा एकदा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेत दोन-चार दिवसांपूर्वी एका कर्मचाऱ्याने तीन मुलींच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत अनेकवेळा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार स्थानिक लोकांच्या चर्चेतून उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची तक्रार मुलींनी तेथील एका महिला कर्मचाऱ्याला केली. त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने हे प्रकरण रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले. या प्रकाराची भनक या नराधम कर्मचाऱ्याला लागताच तो फरार झाला आहे.
तर संस्थेमध्येच काम करणारी त्याची पत्नी या धक्क्यातून आजारी पडल्याने तिला तीच्या माहेरी पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या संस्थेत एवढी भयानक घटना घडल्यानंतरही पोलिसांना याची खबर का दिली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संस्थेतील वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण दाबत तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये या संस्थेच्या कार्यापद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोर्चेही काढले आहेत. या संस्थेतील मुलींच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन येथील कर्मचारी त्यांच्याशी दुष्कर्म करत असल्याच्या घटना या अगोदर देखील घडल्या आहेत. या प्रकरणाबाबत पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, रमामाई मुक्ती मिशन या संस्थेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. असं असताना आता पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेची नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे असाह्य मुलींचा गैरफायदा घेणाऱ्या फरार नराधमाला पकडून या संस्थेतील मुलींना न्याय देण्याची मागणी नागरिंकामधून होत आहे.