पुणे : पुण्यातील भांडारकर रोडवर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे . लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत भांडारकर रोडवरील आणि भोसरी येथील लॉजमध्ये घडला आहे.
याप्रकरणी अहमदनगर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने २६ फेब्रुवारीला डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम बाबाजी रोहकले (वय-२३ मुळ रा. भाळवणी ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्याद एकाच जिल्ह्यातील असून दोघेही एकमेकांना ओळखतात. आरोपीने पीडित तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला लग्नाचे आमिष दाखवून पुणे आणि भोसरी येथील हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार करत आहेत.