पुणे : पुण्यात सोशल मीडियाच्या ओळखीतून अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत इंन्स्टाग्रामवर ओळख निर्माण केली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणावर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी ३० मे रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्तात्रय बाबुराव शिंदे (वय-२२ रा. तुकाईनगर, वडगाव, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलीची फेब्रुवारी २०२३ मध्ये इंन्स्टाग्राम सोशल मिडीयावर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्या ओळखीतून आरोपीने मुलीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला धमकी देऊन लगट केले.
मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध प्रस्थापित केले. तसेच तिला धमकी देऊन सिहंगड किल्ला परिसरात नेऊन अत्याचार केले. पिडीत मुलीने त्याला नकार दिला असता आरोपीने तिला मारहाण करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.