दौंड : दौंड तालुक्यातील एमआयडीसी येथे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 1 मे ते 19 जुलै 2024 दरम्यान कुरकुंभ एमआयडीसी येथील चितळे प्लॉट परिसरात घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल संजय गव्हाणे (सध्या रा. दौंड) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ही पाच महिन्यापूर्वी आपल्या आई व लहान भावासोबत छत्रपती संभाजी नगर येथून पुण्यात कामानिमित्त आली आहे. त्यावेळी आरोपी राहुलने त्यांना दौड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील चितळे प्लॉट परिसरातील भाड्याच्या खोलीत ठेवले. तेव्हापासून पीडिता आपल्या आई व भावाबरोबर तिथे राहत होती. आरोपी घरी येऊन अभ्यास करण्याच्या बहाण्याने पीडीतेला जवळ बोलावून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. पीडितेने नकार दिल्यास तो तिला मारहाण करायचा.
दरम्यान, आई बाहेर गेल्याचे पाहून आरोपी घरात आला व पिडीत मुलीला जवळ ओढत अश्लील चाळे केले. तसेच तोंड दाबून तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून आरोपी अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीच्या शोधासाठी दौंड पोलिसांचे पथक रवाना झाले असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.