पुणे : पुण्यातील मांजरी खुर्द परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीची आई, आरोपी पती, सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला असून एका २० वर्षीय तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २१ जून २०२३ ते १६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मांजरी खुर्द आणि पीडित मुलीच्या घरी घडला आहे.
याप्रकरणी मांजरी खुर्द येथे राहणाऱ्या पीडित १७ वर्षीय मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी १८ फेब्रुवारीला तक्रार दिली आहे. यावरुन पती अजय राजु चौगुले (वय-२० रा. मांजरी खुर्द), सासू मनिषा राजु चौगुले (वय-३८ रा. मांजरी खुर्द), आई विमल अनिल चव्हाण (वय-४२ रा, सहजपुर, उरुळी कांचन) यांच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींना मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न अजय चौगुले याच्यासोबत हिंदू विवाह पद्धतीने लावून दिले. हे लग्न २१ जून २०२३ रोजी पार पडलं होतं. लग्नानंतर आरोपी अजय याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी पती, सासू आणि पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदे करत आहेत.