पुणे : पुण्यातील वडगाव परिसरात एका चाळीतील घरात आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत निघृण खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांना चक्क देशी दारूच्या बाटलीवरून आरोपीचा शोध घेतला.
आरोपीने घटनास्थळावर रिचवलेल्या दारूच्या रिकाम्या बाटलीवरील ‘बॅच नंबर २७०’ वरून पोलिस या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचले. आणि तीन दिवसात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अजय उर्फ बबलू रामेश्वर चौरे असं आरोपीचे नाव असून नुकतेच त्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
नेमकं काय घडल?
पुण्यातील वडगाव परिसरातील एका चाळीत राहणारी अडीच वर्षांची चिमुकली २१ ऑक्टोबर २०१७ च्या रात्री आईच्या कुशीत विसावली होती. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना आईच्या कुशीतून मुलगी बेपत्ता झाल्याचा फोन आला. यावेळी तातडीने उपनिरीक्षक गिरीश सोनवणे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. यानंतर शहरातील नाईट राऊंडच्या सुमारे ४०० ते ५०० जणांच्या पोलिस फोर्सद्वारे मुलीचा शोध सुरू झाला.
रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका दूध विक्रेत्याने एका शेतात एक मुलगी मृत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्याचे सांगतिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता आईच्या कुशीतून गायब झालेली हीच ती मुलगी असल्याचे समोर आले. यानंतर डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार तसेच गळा आवळून तिचा खून करण्यात आल्याचे सांगितले.
चिमुकलीवर बलात्कार करून आवळला गळा
आरोपी बबलू चाळीतील मित्राच्या घरातून जात होता. त्यावेळी त्याला चाळीतील एका घरात एक महिला, पुरुष व लहान मुलगी झोपल्याचे आढळले. महिलेला बघताच त्याच्या मनात वाईट विचार आला. मात्र, तिला छेडले तर तिचा नवरा उठेल आणि आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षीय चिमुकलीला उचलून घरापासून जवळच असलेल्या झुडपात नेले. तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून केला.
असा झाला खुनाचा उलघडा
दरम्यान, दारू बनवणाऱ्या कंपनीने २७० बॅच नंबरच्या १७ हजार बॉटल्स बनवल्या होत्या. त्या १५ डिस्ट्रिब्युटर्सला त्यांनी वितरित केल्या होत्या. यानंतर सोनवणे आणि त्यांच्या टीमने परिसरातील सगळ्या देशी दारुच्या दुकानांमध्ये जात चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पचनामा केला असता त्यांना मृतदेहापासून जवळच २-३ देशी दारूच्या बाटल्या आढळल्या. या बाटल्यांवर असलेल्या तारखेच्या बाजूला ‘२७०’ क्रमांक होता.
पोलिसांना दारूच्या दुकानातील व्यक्ती ही अजय उर्फ बबलू रामेश्वर चौरे असून तो स्त्रीलंपट स्वभावाचा असल्याचे समजले. यानंतर त्याच्या मूळ गावातून पोलिसांनी आरोपीला अटक केली. यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली.
याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक गिरीश सोनवणे म्हणाले की, कोणताही पुरावा घटनास्थळी नसताना पालकांना कुणावरही संशय नसताना देखील लहान बाबींकडे दुर्लक्ष न करता तपास केला तर आरोपीला शिक्षा मिळू शकते. त्या निरागस चिमुकलीला आम्ही न्याय देऊ शकलो. तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला आम्ही शिक्षेपर्यंत पोचविले याचे आम्हाला समाधान आहे. गुन्ह्यात पुरावा नसताना घटनास्थळाजवळ मिळून आलेल्या दारूच्या बाटलीच्या बॅच क्रमांकावरून मी व माझ्या पथकातील सहकाऱ्यांनी आरोपीचा छडा लावला.