पुणे : लोणावळा ते शिवाजीनगरदरम्यान नवीन लोकल ट्रेन सुरू करण्यात येत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज ३१ जानेवारीला दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून ही नवीन लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेससाठी कर्जत स्थानकावर थांब्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेससाठी लोणावळा येथे थांब्याचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
करोना काळात लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र करोना नंतरही पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या दुपारच्या वेळेतील लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. दुपारच्या वेळेत देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी ब्लॉक घ्यावा लागत असल्याचे कारण रेल्वे विभागाकडून देण्यात आले होते.
अशा असतील फेऱ्या
रेल्वे विभागाने शिवाजीनगर-लोणावळा दरम्यान दोन फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार पासून या फेऱ्या सुरु होणार आहेत. शिवाजीनगर स्थानकावरून दुपारी १२.०५ वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी ०१.२० वाजता लोणावळा स्थानकावर पोहोचेल. तर लोणावळा स्थानकावरून सकाळी ११.३० वाजता लोकल सुटेल. ही लोकल दुपारी १२.४५ वाजता शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.