खेड : खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागातून मला ४ हजार रुपये घेऊन ऑफलाइन बोगस रेशनकार्ड बनवून दिले आहे. यासाठी ४ लाख रुपयांची लाच घेतल्याचे सर्व पुरावे देखील माझ्याकडे आहेत, हे प्रकरण दाबण्यासाठी १० लाख रुपये द्या, अशी मागणी खुद्द तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे करण्यात आल्याची घटना घडली आहे.
यासंदर्भात खेड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया आज करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षी खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गणेश रोकडे यांच्या कार्यकाळात एका व्यक्तीला ४ हजार रुपये लाच घेऊन ऑफलाइन पद्धतीने बोगस व्यक्तीच्या नावे रेशन कार्ड देण्यात आले.
ही लाच संबंधित अधिकाऱ्याला ऑनलाइन पध्दतीने देण्यात आल्याचे पुरावे संबंधित व्यक्तीकडे आहेत. तसेच दोघांमधील संभाषण देखील उपलब्ध असल्याचे सांगत तुम्हाला हे प्रकरण बंद करायचे असेल, याबाबत चर्चा होऊ द्यायची नसेल, तर मला १० लाख रुपये द्या, अशी मागणी संबंधित व्यक्तीने तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे केली.
याबाबत बोलताना ज्योती देवरे म्हणाल्या की, एका व्यक्तीने मला फोन करून बोगस रेशनकार्ड प्रकरण बंद करायचे असेल, तर १० लाख रुपये द्या, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची व त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी खेड पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली आहे. याबाबत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया शनिवारी (दि. ३०) पूर्ण करण्यात येईल.