योगेश शेंडगे
शिक्रापूर (पुणे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे व्यावसायिकाला व्यवसाय वाढीसाठी पाच कोटी कर्ज देतो असे सांगून इंडोस्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या मॅनेजर व इतर दोन जणांनी लाखो रुपये कमिशन घेऊन कर्ज न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर संग्राम आबुराव सातव (वय 46 वर्षे रा. शेळके वस्ती मराठी शाळेजवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे ) या व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी जनाबाई संग्राम सातव (वय 42 वर्षे रा. शेळके वस्ती मराठी शाळेजवळ रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे उपेंद्र यशवंत पाटील (रा. थेरगाव, पुणे) ,इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर विशाल घाटगे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व मच्छिंद्र पोपट झंजाड (रा.सांगवी सूर्या, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) या तिघांवर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील संग्राम सातव यांची रबर कंपनी असल्याने त्यांना कंपनी वाढीसाठी कर्ज हवे होते. इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र, तसेच विशाल घाटगे व झंजाड यांनी सातव यांना कर्ज मिळवून देण्यासाठी काही पैशांची मागणी केली.
दरम्यान सातव यांनी त्यांच्या घरावर कर्ज काढून इंडोस्टार हाउसिंग फायनान्स खराडी शाखेचे मॅनेजर उपेंद्र यांना पाच कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यासाठी चाळीस लाख रुपये, विशाल घाटगे यास पन्नास लाख कर्ज मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपये तसेच झंजाड नावाच्या व्यक्तीस कर्ज मिळवून देण्यासाठी तीन लाख रुपये दिले. मात्र सदर फायनान्स मॅनेजरसह इतर दोघांनी सातव यांचे फोनच उचलत नसल्याने आणि कर्ज देखील मंजूर करत नसल्याने सातव यांनी मानसिक तणावात जाऊन राजणगाव गणपती लांडेवस्ती येथील जे एम एन इंजिनिअरींग प्रा.ली कंपनीच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले.
यातील आरोपी उपेंद्र यशवंत पाटील (रा. थेरगाव, पुणे) व आरोपी मच्छिंद्र पोपट झंजाड (रा.सांगवी सूर्या, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली असून 5 एप्रिल 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके हे करत आहे.