-राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यात महायुतीचा व महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश थोरात यांची दौंड तालुक्यातील गावभेट दौरा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून याची सांगता दि.16 रोजी यवत येथे पार पडली. यवत येथील कार्यकर्त्यांनी रमेश थोरात यांची बैलगाडी मधून भव्य मिरवणुक काढली. यानंतर कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दत्ता डाडर, उत्तम गायकवाड, पोपट लकडे, तात्या ताम्हाणे, सोहेल खान, अरविंद दोरगे, मोहसीन तांबोळी, सारिका भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी रमेश थोरात हे 50 वर्षापासून फक्त समाज सेवा करत असून दौंड तालुक्याच्या विकासासाठी रमेश थोरात यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन केले.
बाळासाहेब कापरे यांनी केडगाव येथे अमोल कोल्हे यांची जाहीर सभा झाली. यावेळी केडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून निवडणुकीच्या 23 तारखेचा निकाल त्या दिवशीच लागला की काय ? अशी भिती कुल यांना निर्माण झाल्याने त्यांनी कोल्हे यांच्यावर टीका केली असे म्हटले व निषेध व्यक्त केला. अतिथी देवो भव याप्रमाणे आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे ही आपली परंपरा आहे. परंतु तालुक्याचा प्रथम नागरिक जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर ही कितपत योग्य आहे. यवत हे तालुक्यातील मोठे गाव असून अजूनही शैक्षणिक सुविधा का उपलब्ध नाही, यवत गावची बाजारपेठ कोणी संपवली, भीमा पाटस कारखाना भाडेतत्त्वावर दिला असल्यास आमदार कारखान्यावर का जातात? असा प्रश्न उपस्थित केला. रमेश थोरात हे आमदार झाल्यानंतर या तालुक्याची शैक्षणिक प्रगती होणार आहे, आरोग्याची सेवा सुधारणार आहे, यासाठी रमेश थोरात यांना मतदान करा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी रमेश थोरात यांनी 50 वर्षापासून राजकारण करत असून 40 वर्ष जिल्हा बँकेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. दौंडचा शेतकरी सधन झाला, शेतीला ठिबक पाईपलाईन, ट्रॅक्टर, सह इत्यादी कामासाठी मुलांच्या शिक्षणासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले, यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. धनगर समाज बांधवांना पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देणार होते. 10 वर्षानंतरही मिळाले नाही. कुल यांनी जानकर साहेबांनी दिलेला एबी फॉर्म काढत जानकर यांच्या पाठित खंजीर खुपसला हे सगळं समाज बांधवांना माहिती असून याची कसर भरून काढायची आहे. दौंड तालुका संपूर्ण दहशत, दादागिरीने भयभीत झाला आहे, मात्र तुम्ही कोणाच्याही दादागिरी ला घाबरू नका, असे आवाहन रमेश थोरात यांनी केले.
माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी परमेश्वराने दिलेले असून कशाचीही अपेक्षा न करता फक्त जनतेची सेवा करणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याने आपण सर्वांनी 20 तारखेला तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन रमेश थोरात यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.