पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचारही जोरदार केला जात आहे. नेत्यांच्या प्रचार सभा पार पडत आहेत. कुणाचे विधानं चर्चेत येत आहेत तर काहींच्या जुन्या आठवणी. असाच एक प्रकार राज ठाकरे यांच्याबाबत खड्कवासला येथील प्रचार सभेत घडला आहे. माझा मित्र आणि सहकारी स्वर्गीय रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वाजळेंचा प्रचार करायला मी इकडे आलो आहे. मला तो दिवस अजून आठवतोय. रमेश शेवटचा कोणाशी बोलला असेल तो माझ्याशी बोलला, त्याने मला फोन केला आणि म्हणाला मी एमआरआय काढायला आलोय, तो झाला की फोन करतो आणि थोड्यावेळाने मला फोन आला की तो गेला. मला काय बोलायचं तेच कळेना, असं म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे खडकवासला जाहीर सभेत भावूक झालेले दिसून आले.
मला अनेक जणं सोडून गेले पण आज माझा रमेश असता तर मला सोडून गेला नसता. मयुरेश मला रमेशची आठवण करून देतो. आकाराने पण तसाच आहे आणि सोन्याने मढलेला पण तसाच आहे. त्यामुळे तुम्ही जे मतदान कराल ते मयुरेशला कराल तसंच मतदान तुम्ही रमेशला पण कराल, असं मनसेप्रमुख राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले. राज ठाकरे यांनी काल पुण्यात खडकवासला विधानसभेचे मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरे बोल्ट होते.
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या- राज ठाकरे
मयुरेश जेव्हा माझ्याकडे सर्वप्रथम आला. त्यावेळी मला वाटले माझा पुतण्या राहुल ठाकरे आला आहे. कारण माझा पुतण्या राहुल ठाकरे आणि मयुरेश वांजळे दोघंही सारखेच दिसतात. त्यानंतर मला कोणीतरी सांगितले की रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे आला आहे. मी म्हटलं मयुरेश देखील माझा पुतण्याच, असं राज ठाकरे यांनी सांगितले.
पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं..
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, खरंच मनापासून सांगतो, पुण्याचा झालेला सत्यानाश पाहून वाईट वाटतं. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, राग येत नाही हे पाहून मला जास्त वाईट वाटतं. एकदा तुमच्या हातातील फोनमध्ये डोकावून बघा, जग कुठे गेलं आहे ते. आपण रस्ते, पाणी, गटारं यातच अडकलो आहोत. पण याचा तुम्हाला राग येत नाही. जगाच्या मागे आपण किती पडलो आहोत याचं आपल्याला काही वाटत नाही. हे वाईट आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.